राज्यात जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राला लागू अशी मदत जाहीर केली आहे. मदत वितरणाची प्रक्रिया डीबीटीद्वारे सुरू असून आतापर्यंत ३ लक्ष ६२ हजार २२४ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ३३६ कोटी ९७ लक्ष रुपये जमा करण्यात आले आहेत.
तथापि, अनेक शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण न झाल्याने त्यांच्या खात्यात मदत जमा होऊ शकलेली नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी तालुकास्तरीय अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, पोलीस पाटील, सरपंच, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, कोतवाल किंवा आधार सेवा केंद्र प्रतिनिधी यांच्याकडून व्ही. के. नंबर प्राप्त करून जवळच्या आधार सेवा केंद्रात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, प्रशासकीय पातळीवर निधी वितरणासाठी गतीने कार्यवाही सुरू असून, शेतकरी बांधवांना मदत तातडीने मिळावी यासाठी प्रलंबित ई-केवायसी असलेल्या शेतकऱ्यांची यादी तातडीने जिल्हा संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश सूचनाविज्ञान केंद्राला देण्यात आले आहेत.







