विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
दिग्रस भूमी अभिलेख कार्यालय, येथील उपअधिक्षक व भूमापक या दोन शासकीय अधिकाऱ्यांना मालमत्तेच्या फेरफार प्रकरणात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ यांनी रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आली.या प्रकरणात आरोपी भूमी अभिलेख कार्यालय उपअधीक्षक सखाराम नरसिंग पवार (वय – ४९) वर्षे व नझुल परिरक्षण भूमापक आशिष काशिनाथ शेलोकर (वय – ४७) रा. भूमी अभिलेख कार्यालय, दिग्रस यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील महिला तक्रारदार यांच्या सासऱ्यांनी त्यांची मालकीची मालमत्ता तक्रारदार व त्यांच्या पतीस बक्षीसपत्राद्वारे दिली होती. सदर बक्षीसपत्रानुसार मालमत्तेचा फेरफार करून घेण्यासाठी तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्रे भूमी अभिलेख कार्यालय, दिग्रस येथे आरोपी आशिष शेलोकर यांच्याकडे सादर केली. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना उपअधिक्षक सखाराम पवार यांची भेट घेण्यास सांगितले.
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबी पथकाने दिनांक ३ फेब्रुवारी रोजी पडताळणी कारवाई केली. या पडताळणीदरम्यान आरोपी आशिष शेलोकर यांनी फेरफार करण्यासाठी स्वतः साठी व उपअधिक्षक यांच्यासाठी एकूण ५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानंतर आयोजित सापळा कारवाईदरम्यान आरोपी शेलोकर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपये स्वीकारले. यापैकी अडीच हजार रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित अडीच हजार रुपये उपअधिक्षक सखाराम पवार यांना देताना दोन्ही आरोपींना उपअधिक्षकांच्या कक्षात रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी दिग्रस पोलीस स्टेशन येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती सचिंद्र शिंदे व पोलीस उपअधिक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके, अर्जुन घनवट व त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे











