विजय कदम
(लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
तृतीयपंथीय व्यक्ती नियमानुसार विहित हक्क व सेवांपासून वंचित राहू नये यासाठी त्यांच्याकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संबंधित पोर्टलवर नोंदणी करून तत्काळ ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांनी आज येथे केले.
अत्याचार व हिंसेमुळे मृत्यू झालेल्या तृतीयपंथीय व्यक्तींच्या स्मरणार्थ 20 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर स्मरणदिन पाळला जातो. त्यानिमीत्त समाजकल्याण कार्यालयात कार्यक्रम झाला. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे पदाधिकारी, आयुष्यमान भारत जिल्हा समन्वयक, तसेच 27 तृतीयपंथीय व्यक्ती व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीमती मून म्हणाल्या की, तृतीयपंथी व्यक्तींनी https://transgender.dosje.gov.in या पोर्टलवर नोंदणी करुन तात्काळ ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. त्यामुळे शासनाकडील माहिती अद्ययावत होऊन मतदानपत्र व इतर दाखले आदी बाबींची प्रक्रिया करता येईल. आपल्या कुठल्याही समस्या असल्यास सोमवार किंवा शुक्रवार समाजकल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेटता येईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. स्मिता महल्ले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विशाल टावरी यांनी स्माईल योजना, आरोग्य योजनांबद्दल माहिती दिली. अंजूश्री डेरे यांनी स्वागत केले. तृतीयपंथीय व्यक्तींना भारतीय संविधानाच्या प्रास्तविकाची प्रत देऊन गौरविण्यात आले. गौरव गावंडे यांनी आभार मानले.







