विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
पक्षी, मानव आणि पर्यावरणास होणारा गंभीर धोका लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, विकास मीना यांनी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या प्लॅस्टिक किंवा कृत्रिम धाग्याच्या निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापरास कायमस्वरूपी बंदी घालण्याचा आदेश पारित केला आहे. हा आदेश पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ च्या कलम ५ अन्वये तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे पक्षी आणि मानवांना तीव्र स्वरूपाच्या व काही प्रसंगी प्राणघातक इजा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः मकरसंक्रांतीच्या सणादरम्यान याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. या अविघटनशील धाग्यामुळे होणाऱ्या जीवितहानीला प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा मांजा लवकर विघटन न होण्याजोगा असल्याने गटारे, नदी आणि नाल्यांसारख्या नैसर्गिक प्रवाहांमध्ये अडथळे निर्माण करतो. गायी आणि तत्सम प्राण्यांनी खाद्य म्हणून नायलॉन मांजाचे तुकडे सेवन केल्यास त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. यामुळे पशुधनाला धोका निर्माण होतो, तसेच माती आणि पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरते. विजेच्या तारांवर या धाग्यांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून आग लागणे, वीजप्रवाह खंडित होणे, उपकेंद्रे बंद पडणे आणि इलेक्ट्रिक उपकरणांना बाधा पोहोचणे असे अपघात घडतात.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, नायलॉन मांजाची विक्री किंवा साठवणूक करणाऱ्या घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांच्यावरही जिल्ह्यात प्रतिबंध घालण्यात आले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणतीही व्यक्ती किवा संस्था पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ चे कलम १५ नुसार शिक्षेस पात्र राहील.
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागाने तात्काळ पथके गठीत करावीत. तसेच, नायलॉन मांजाच्या वापराने होणाऱ्या अपघातांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी, असे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहे.











