विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
महागाव तालुक्यातील मौजा वाकोडी वाडी येथील नदी घाटावर सुरू असलेल्या अवैध रेती उपशाची माहिती मिळाल्यानंतर महागाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे यांनी पथकासह कारवाईसाठी धाव घेतली. मात्र कारवाईदरम्यान पाच ते सात रेती उपसा करणाऱ्या टोळक्याने पोलिसांच्या कारवाईला तीव्र विरोध करत सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
ख्वाजा नावाच्या इसमाने सिमेंटचे झाकण अंभोरे यांच्यावर भिरकावल्याची माहिती आहे. परिस्थिती गंभीर होताच बचावात्मक कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी आरोपीला लागल्याचे समजते. फायरिंग होताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पाच आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस दल वाकोडी वाडी येथे पाचारण करण्यात आले. घटनास्थळी महागाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक धनराज निळे, महागाव तालुक्याचे तहसीलदार अभय मस्के तसेच उमरखेडचे पोलीस निरीक्षक पांचाळ यांनी भेट देऊन पाहणी केली.
या घटनेत गंभीर जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे यांना मेडिकेअर हॉस्पिटल पुसद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची अधिकृत माहिती आहे. घटनेचा पुढील तपास महागाव पोलीस स्टेशन करत आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून महागाव तालुक्यात रेती माफियांची वाढती दहशत प्रशासनासाठी गंभीर डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.













