बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सहस्त्रकुंड परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृत्यूदह आढळला
विजय कदम (लोकहित न्यूज संपादक)
उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत सहस्त्रकुंड परिसरात पैनगंगा नदीपात्रात पिवळ्या रंगाच्या पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह कोणीतरी बाहेरून आणून नदीपात्रात फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, त्यामुळे संबंधित व्यक्तीची हत्या करून मृतदेह पोत्यात बांधून पैनगंगा नदीपात्रात टाकण्यात आल्याचा संशय बळावला आहे.
घटनेची माहिती मिळताच बिटरगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) पाठवण्यात आला आहे. मात्र, सदर इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही.
या घटनेमुळे बाहेरगावातून एखाद्या व्यक्तीची हत्या करून मृतदेह पैनगंगा नदीपात्रात टाकण्यात आला का? असा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. किनवट येथील एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह पैनगंगा नदीपात्रात फेकण्यात आला होता, जो पुढे सेवानगर, कासाळबेळ, (महागाव तालुका) परिसरात आढळून आला होता. त्या प्रकरणात किनवट पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्ह्याचा छडा लावला होता. चौकशीत पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे उघडकीस आले होते.सध्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनासमोर गुन्ह्याचा तपशील उलगडणे व मृत इसमाची ओळख पटवणे हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे व पोलीस कर्मचारी करीत आहेत मार्गदर्शनाखाली सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.













