विजय कदम लोकहित लाईव्ह न्यूज संपादक
घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चौधरी यांनी चिखलवर्धा चौफुलीवर एका वाहन चालकाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून,या प्रकरणी आज बुधवार दि.२४ जून,(बुधवार) रोजी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.कुमार चिंता यांना निवेदनात्मक तक्रार सादर करण्यात आली.
तक्रारदार शेख शाकीर शेख कम्मु (रा.कुर्ली,ता.घाटंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,ते मालवाहू वाहन चालविण्याचा व्यवसाय करतात.दि.१९ जून रोजी रात्री ते इर्शाद कलीमउल्लाखाँ यांच्या मालकीची चार शेती उपयोगी जनावरे घेऊन आर्णी येथून इचोडा (जि.आदिलाबाद) येथे जात असताना चिखलवर्धा चौफुलीवर पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चौधरी यांनी त्यांचे वाहन अडविले.
तक्रारीनुसार,कोणतीही विचारपूस न करता “तू जनावरे कत्तलीसाठी नेत आहेस” असा आरोप करीत ठाणेदारांनी लोखंडी पाईप व लाकडी दांड्याने भर चौकात मारहाण केली.यावेळी क्लिनर शेख आदिल मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला असता त्यालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार,त्यांच्याकडे जनावरांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कागदपत्रे असूनही त्यांची कोणतीही बाजू ऐकून न घेता शिवीगाळ करण्यात आली.तसेच “माझ्याबद्दल कुठेही बोललास तर परिणाम भोगावे लागतील,मला जिल्ह्यात ‘सिंघम’ म्हणून ओळखतात” अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा,खोटी गुन्हे नोंदविण्याची धमकी दिल्याचा आणि पोलिस कोठडीत ठेवून योग्य सुविधा न दिल्याचाही गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे.
या संपूर्ण घटनेबाबत तक्रारदार शेख शाकीर शेख कम्मु व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी चळवळीचे प्रा.पंढरी पाठे यांच्याशी चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शेख शाकीर यांनी सांगितले की,”माझी कोणतीही बाजू न ऐकता मला मारहाण करण्यात आली.मारहाणीमुळे मला गंभीर दुखापत झाली असून मागील दोन दिवस मी अंथरुणावर होतो.माझ्या लग्नाला अवघे दीड वर्ष झाले असून सात महिन्यांचा मुलगा आहे.”
“जर माझ्याकडून कोणताही गुन्हा झाला असेल,तर कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करता आली असती.मात्र कायदा हातात घेऊन भर चौकात मारहाण करण्याचा अधिकार कोणालाही नाही.स्वतःला ‘सिंघम’ समजणाऱ्या अधिकाऱ्याला नागरिकांना मारण्याचा अधिकार कोणी दिला?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
दरम्यान,आज पोलीस अधीक्षक मा.कुमार चिंता यांनी तक्रारदारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर तत्काळ पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत या प्रकरणाबाबत जाब विचारला. “मारहाण करण्याऐवजी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करायला हवी होती,” अशा शब्दांत पोलीस अधीक्षकांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत तीन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या असून,चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल,अशी शाश्वती दिली.
यावेळी तक्रारदार शेख शाकीर शेख कम्मु यांच्यासह शेतकरी चळवळीचे प्रा.पंढरी पाठे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष मुज्जू पटेल.वैष्णव लांडगे,कृष्णा पेंचलवार,विजय बडदे.,समीर शेख,शेख आदिल आदी उपस्थिरामचंद्र लेंगुरे.स्वप्नील मानकर.राजू शिडाम. टिनु शेंडे..गोलू बावनकर.करण मेश्राम. रमेश मेश्राम. सूरज कचरे. विनोद रामगडे.हे सर्व उपस्थित होते












