.
विजय कदम लोकहित न्यूज संपादक
हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त पुसद ते गहुली दरम्यान आयोजित करण्यात आलेली भव्य कृषीदिंडी मंगळवारी उत्साहात पार पडली. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, वसंतराव नाईक जयंती उत्सव समिती आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जयंतीउत्सवात बहुसंख्ये वसंतप्रेमी, शेतकरी व नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते.
जयंतीनिमित्त सकाळी वसंतराव नाईक चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. माजी प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. नगराध्यक्ष मोहिनी नाईक, बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, दीपक आसेगावकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी, उपविभागीय अधिकारी आशिष बीजवाल, मुख्याधिकारी किरण सुकलवाड तसेच विविध मान्यवर, नगर परिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी,आभासीकेचे व शाळेतील विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
यानंतर कृषी दिनाचे औचित्य साधून नाईक चौकातून गहुली स्मृतिस्थळाकडे कृषीदिंडीला प्रारंभ झाला. कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारा आकर्षक ट्रॅक्टर पुढे ठेवून दिंडी मार्गस्थ झाली. मान्यवरांसह शेकडो नागरिकांनी दुचाकींवरून या दिंडीत सहभाग नोंदविला. नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांनीही स्वतः दुचाकी चालवत दिंडीत सहभाग घेतला. वरुड, ज्योतीनगर, घाटोडी, बजरंगनगर आणि चोंढी येथे ग्रामस्थांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
गहुली येथे पोहोचल्यानंतर वसंतराव नाईक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. समाधी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यानंतर ह.भ.प. पंकज पाल महाराज यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन झाले.
भूमिपुत्र अभिवादन सोहळ्यानिमित्त आयोजित सभेत माजी मंत्री मनोहरराव नाईक, नगराध्यक्ष मोहिनी नाईक, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड, गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, दीपक आसेगावकर, धनंजय सोनी, राजाराम जाधव, जीवन पाटील, सदाबाबराव मोहटे, बाळाभाऊ कामारकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कौसरभाई, नगर परिषद उपाध्यक्ष अर्चना जगताप, पाणीपुरवठा सभापती राजू सोळंके, शिक्षण सभापती खडसे सर, बांधकाम सभापती अभिजित पानपट्टे, आरोग्य व स्वच्छता सभापती मजरखान पठाण, डॉ. श्याम जाधव, विकास नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांनी कृषीला उद्योगाची जोड देणे, जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारणे आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रत्येक गावात व प्रत्येक शेतात प्रभावीपणे राबविणे, हीच वसंतराव नाईक यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत व्यक्त केले. दीपक आसेगावकर, संदेश चव्हाण आणि डॉ. टी. सी. राठोड यांनीही वसंतराव नाईक यांच्या कृषी, ग्रामीण विकास आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले, तर आभार प्रा.नरेंद्र जाधव यांनी मानले. तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्यास पुसदसह महागाव व इतर परिसरातून आलेल्या नाईक प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.













