विजय कदम लोकहित न्यूज संपादक
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय, उमरखेड येथे १ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्र कृषी दिन’ मोठ्या उत्साहात आणि पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरासह तालुक्यातील स्मार्ट ग्राम नागापूर आणि ग्राम बारा येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या वतीने नागापूर आणि बारा येथील मोक्षधामसह विविध भागात तब्बल ८० पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी नागापूर येथील श्री. चितांगराव कदम, जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षक, दोन्ही गावांतील सरपंच, उपसरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केवळ वृक्षलागवड न करता, लावलेल्या सर्व वृक्षांचे संवर्धन व संगोपन करण्याची सामूहिक शपथ आणि संकल्प यावेळी सर्व उपस्थित, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सचिन चिंतले हे होते. याप्रसंगी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना प्राचार्य सचिन चिंतले, प्रा. तुषार चव्हाण, प्रा. पी. व्ही. गोटेकर, प्रा. योगेश वाकडे आणि डॉ. सुनील पवार यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील ऐतिहासिक आणि दूरदृष्टीच्या कार्याचा गौरव केला. आजच्या काळात आधुनिक व शाश्वत शेतीची गरज अधोरेखित करतानाच, उपस्थितांना शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा स्वीकार, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन वक्त्यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होऊन सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाली.
यावेळी मंचावर प्राध्यापिका डॉ. श्वेता सोळंके, डॉ. माधवी भालदरे, कु. पल्लवी घोटेकर, प्रा. संतोष अंभोरे, तसेच श्री. किशोर आगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी “झाडे लावा – झाडे जगवा” हा सामाजिक संदेश देत या उपक्रमात अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन कु. प्रीती बुरकुले व कु. कांचना आढाव यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














