मातोश्री जतनबाई रामसिंग शेखावत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; चौकशी करून दोषींवर कारवाई करा. गंगाधर गायकवाड यांची मागणी
विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
हिमायतनगर तालुक्यातील मातोश्री जतनबाई रामसिंग शेखावत प्राथमिक/माध्यमिक वि.जा.भ.ज. आश्रम शाळा, हिमायतनगर येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत तसेच शाळेतील कथित प्रशासकीय अनियमिततेबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास), किनवट यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, वसतिगृहाचे अधीक्षक व काही शिक्षक हे मुख्यालयी न राहता दररोज सुमारे ४० ते ५० किलोमीटर अंतरावरून ये-जा करतात. तसेच शाळेत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक (वॉचमन) नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, काही विद्यार्थी परवानगीशिवाय वसतिगृहाबाहेर जात असल्याचेही निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांना दर्जेदार व पुरेसे भोजन मिळत नसल्याच्या तक्रारी पालकांकडून होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात आणखी एक गंभीर बाब नमूद करण्यात आली आहे. दि. ४ जुलै रोजी सायंकाळी काही विद्यार्थिनी शाळेबाहेर जात असताना बसच्या धडकेपासून चालकाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.
या सर्व प्रकरणाची तक्रारदारांच्या उपस्थितीत सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी गंगाधर गायकवाड दिघीकर,नागोराव शिंदे पळसपुरकर, देवानंद गुंडेकर सरसमकर यांनी आपल्या निवेदनातून केली आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.














