विजय कदम( लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचा अखंड वसा जपत समाजात वृक्षप्रेमाची चळवळ रुजविणाऱ्या औदुंबर वृक्ष संवर्धन समिती, उमरखेड यांच्या वतीने वृक्ष लागवड वर्धापनदिन व वृक्ष वाढदिवस सोहळा शुक्रवारी (दि. 26 जून) अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यक्रमास प्रारंभ झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. वि. ना. कदम होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी श्री. सखाराम मुळे, माजी आमदार श्री. विजयराव खडसे, श्री. चितंगराव कदम, श्री. सुधाकर वानखेडे, महिला पत्रकार सौ. सविता चंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी श्री. सखाराम मुळे यांनी आपल्या मनोगतात समितीच्या कार्याचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “जिद्द, चिकाटी आणि सातत्य यांच्या बळावर लावलेले छोटेसे रोपटे आज ‘औदुंबर बर्थडे गार्डन’च्या रूपाने घनदाट वृक्षसंपदेत परिवर्तित झाले आहे. ही बाब संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असून समितीचे कार्य खरोखरच अभिनंदनीय आहे.”
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य वि. ना. कदम यांनी वृक्षांचे पर्यावरणातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “झाड लावणे सोपे असले तरी त्याचे संगोपन करणे अत्यंत कठीण असते. औदुंबर वृक्ष संवर्धन समितीने गेल्या दहा वर्षांत सातत्याने हे कार्य अविरतपणे सुरू ठेवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.” तसेच समितीच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त भव्य गौरव सोहळा आयोजित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
सन 2016 मध्ये स्थापन झालेल्या समितीने दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेत प्रत्यक्ष श्रमदान करून आतापर्यंत सुमारे 11 हजार विविध वृक्षांची लागवड, संगोपन व संवर्धन केले आहे. विशेष म्हणजे, समितीने लावलेल्या प्रत्येक वृक्षाचा 26 जून रोजी वाढदिवस साजरा करण्याची अनोखी परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात जपली.
यावेळी समितीच्या बाल वृक्षमित्रांचा गुणगौरव करण्यात आला. प्रतीक सारिका दिलीप भंडारे याने CET परीक्षेत 99.60 पर्सेंटाइल, तर कु. गौरी सुनीता विजय चौधरी हिने पॉलिटेक्निक अंतिम परीक्षेत 90 टक्के गुण मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेलाही प्रोत्साहन देण्याचा समितीचा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद ठरविला.
समितीच्या परंपरेनुसार श्री. घुगे साहेब, श्री. शेवंतराव गायकवाड व श्री. कानिफनाथ शिंदे यांचा वृक्षारोपण करून वाढदिवसही साजरा करण्यात आला.
समितीच्या वृक्षसंवर्धन कार्यासाठी डॉ. विवेक पत्रे – ₹10,000, श्री. दत्तात्रय हेलगंड – ₹2,000, श्री. शेवंतराव गायकवाड – ₹1,100, श्री. सुधाकर वानखेडे – ₹1,100, श्री. कानिफनाथ शिंदे – ₹1,001, सौ. रंजना संतोष माने – ₹1,000, श्री. घुगे साहेब – ₹500 व श्री. नंदकिशोर शर्मा – ₹500 अशी देणगी प्राप्त झाली.
प्रास्ताविकात समितीचे अध्यक्ष विजय रेघाटे यांनी चालू वर्षात ‘एक झाड लेकीचे’, ‘एक घर – एक वृक्ष’, विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप यांसारखे विविध उपक्रम राबवून वृक्ष लागवडीची जनचळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या प्रसंगी श्री हामंद काका, व्यवहारे सर, सुरेश कदम सर, प्रभाकरजी दिघेवार, प्रमोद वाळूकर , डॉ विनय चव्हाण,गजानन बारे, श्री देशमुख सर ,श्री अवधूत वानखेडे सर , श्री गजेंद्र ठाकरे, श्री पाईकराव सर,श्री संदीप घाडगे, डॉ.जयशंकर जवणे, विजय गुजरे, सुनील चेके ,अनिरुद्ध रेघाटे ,गजानन चौधरी, जमीर खतीब, सौ सारिका भंडारे, सौ दिपाली खांडरे ,सौ सुनंदा चव्हाण, शुभांगी रेघाटे तसेच औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य मारोती महागडे काका, वसंतराव जाधव साहेब, अशोक शिरफुले, दिलीप भंडारे, संतोष माने, वीरेंद्र खंदारे, ज्ञानेश्वर खांडरे, धनंजय भागवत, प्रकाश शेळके, संतोष गवळे, वैभव कोडगिरवार, विजय चौधरी, शुभम माने, विजय रेघाटे आदी मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर खांडरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समितीचे सचिव श्री. विजय चौधरी यांनी मानले.
चौकट: एक संस्था दहा वर्ष सतत टिकून राहणे हे गौरवाची बाब आहे:- सखाराम मुळे उपविभागीय अधिकारी














