विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
किनवट व माहूर या आदिवासी व दुर्गम तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या हितासाठी रब्बी पणन हंगाम २०२५–२६ मधील धान/भरडधान्य शासकीय खरेदीस तात्काळ मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री मा. ना. जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, किनवट व माहूर तालुक्यांमध्ये शासकीय खरेदी प्रक्रिया उशिराने सुरू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विहित मुदतीत आपला धान/भरडधान्याचा माल खरेदी केंद्रावर विक्री करता आला नाही. त्यामुळे आजही अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात धान/भरडधान्य शिल्लक असून खरेदीची मुदत संपल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना वाहतूक, नोंदणी तसेच खरेदी प्रक्रियेत विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या विशेष परिस्थितीचा विचार करून शासकीय खरेदीस मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना हमीभावाने धान/भरडधान्य विक्रीची संधी मिळावी व त्यांचे आर्थिक नुकसान टळावे, यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.














