विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी येथे बुधवारी (दि. ८ जुलै) मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेनिमित्त तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी भेट देऊन ग्रामस्थ, बीएलओ व संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला व पुरुष मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तहसीलदार टेमकर यांनी बीएलओंना मतदार पडताळणी प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना देत प्रत्यक्ष फॉर्म भरण्याची माहिती दिली. यावेळी मंडळ अधिकारी बी. एम. चव्हाण, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुशीलकुमार शिंदे, तसेच गावातील पोलीस पाटील, सरपंच,बीएलओ भोयर सर, अंगणवाडी सेविका, देविकाबाई सावते,सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गायकवाड, कृष्णा वानखेडे, दत्तराव वानखेडे, शंकर कदम, गजानन शिरफुले,राहुल माने, ब्रह्मानंद वानखेडे, साहेबराव वानखेडे,केशव घुटे यांच्यासह गावातील नागरिक व विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना तहसीलदार टेमकर यांनी सांगितले की, बीएलओ प्रत्येक मतदाराच्या घरी तीन वेळा भेट देणार आहेत. या काळात आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरून देणे अत्यावश्यक असून, अन्यथा संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. मतदारांनी आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, मोबाईल क्रमांक व आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याबरोबरच फॉर्मवर स्वाक्षरी करणे विसरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
विशेष सघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेंतर्गत मतदार यादीतील मृत, स्थलांतरित व दुबार नावे वगळून पात्र नवमतदारांची नोंद करण्यात येत आहे. एका मतदाराचे नाव केवळ एका मतदारसंघातच असू शकते. त्यामुळे सर्व मतदारांनी बीएलओंना पूर्ण सहकार्य करून आपली माहिती वेळेत अद्ययावत करावी, असे तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांनी आवाहन केले.













