विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नीत व श्री शिवाजी शिक्षण संस्था, पुसद संचलीत कृषि महाविद्यालय, उमरखेड यांच्या वतीने दि. ३० डिसेंबर २०२५ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत ग्राम पोफाळी येथे ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना, सेवा संस्कार आणि युवाशक्तीचा राष्ट्रनिर्माणासाठी उपयोग व्हावा, या हेतूने विद्यापीठाच्या निर्देशानुसार “पाणलोट व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून शाश्वत विकासासाठी युवकांचे योगदान” या संकल्पनेवर (Theme) हे शिबिर आधारित आहे.
दिवस दुसरा: जलसंधारणाची कामे
शिबिराच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन व योग-प्राणायामाने करण्यात आली. या दिवशी श्रमदानातून विद्यार्थ्यांनी गावात शोषखड्डे तयार केले आणि पाटबंधारा बांधला. या उपक्रमामुळे गावातील पाणी अडवण्यास मदत होणार असून, याचा मोठा फायदा स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना होईल.
सेंद्रिय शेती आणि जनजागृती
केवळ श्रमदानच नव्हे तर सामाजिक प्रबोधनावरही भर देण्यात आला. महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका पी. व्ही. घोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तसेच ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अशा घोषणा देत गावातून रॅली काढली. दुपारच्या बौद्धिक सत्रात सहाय्यक प्राध्यापक श्री. टी. ए. चव्हाण यांनी ‘सेंद्रिय शेतीचे महत्त्व व व्यवस्थापन’ या विषयावर विद्यार्थी व ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवर
हा उपक्रम महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. याप्रसंगी पोफाळीच्या सरपंच सौ. रेखाताई क्षीरसागर, उपसरपंच सौ. मनीषा पायघने, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. जी. दरने, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. के. चिंतले, सहाय्यक प्राध्यापक श्री. वाय. एस. वाकोडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. व्ही. बी. शिंदे व डॉ. एस. बी. पवार यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. या शिबिरात ४० स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.













