विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
उमरखेड तालूक्यामध्ये पोलीसांच्या आशिर्वादाने अवैध दारु विक्रीला अक्षरशः उत आलेला आहे. यवतमाळ एलसीबी पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे धडक कारवाई करीत दोन दारु विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या. दि 7 मार्च रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास केलेल्या या छापा कारवाईत पोलिसांनी जवळपास दीड लाख रुपयांच्या देशी विदेशी दारुच्या 37 पेट्या जप्त केल्या. विजय ऊर्फ पप्पू मारोती कर्नेवाड (33) आणि नितीन प्रकाश पलंचेवार (50) दोघेही रा. ब्राह्मणगाव अशी गुन्हा दाखल केलेल्या दारु विक्रेत्यांची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे उमरखेड उपविभागात पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी ब्राम्हणगाव येथे अवैध दारुची मोठया प्रमाणात विक्री होत असल्याची
माहिती या पथकाला मिळाली. त्यावरुन पोलिसांनी छापा टाकत पंचासमक्ष सापळा रचून कारवाई केली. त्यावेळी विजय ऊर्फ पप्पू मारोती कर्नेवाड याच्या घरी देशी दारु भिंगरी १८० एमएलच्या ३२ पेटया सापडल्या. प्रत्येक पेटीत ४८ नग याप्रमाणे एकूण १५३६ नग शिश्या होत्या. तसेच देशी दारु भिंगरी ९० एमएलच्या ५ पेट्या सापडल्या. प्रत्येक पेटीत १०० नग याप्रमाणे एकूण ५०० नग शिश्या होत्या. तसेच नितीन प्रकाश पलंचेवार याच्या ताब्यातून देशी दारु भिंगरी १९० एमएलच्या २० नग शिश्या
तसेच विदेशी ७ नग अशा एकूण २०५६ नग देशी व ७ विदेशी दारुच्या शिश्या ताब्यात घेण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत १ लाख ४६ हजार १७० रुपये आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध उमरखेड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, एलसीबी पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या पथकाने हि कारवाई केली.उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत ब्राम्हणगाव व चातारी हे अवैध दारू विक्रीचे माहेरघर बनले आहे. परिसरातील पोषक राजकिय वातावरणाचा फायदा घेत स्थानिक बीट जमादार अवैध दारू विक्रीला प्रोत्साहन देत दिवसेंदिवस अवैध दारू विक्री दुकानांना अलिखीत परवानगी देत असल्याने परिसरातील शांतता भंग होत असताना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद यांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
एलसीबी पोलीस निरीक्षक सतिष चवरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय धिरज बांडे, पीएसआय शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनिल पंडागळे, राजेश जाधव यांच्या पथकाने पार पाडली.













