उमरखेड शहर तसेच ग्रामीण भागामध्ये विविध विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला असून याबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी औदुंबर वृक्ष संवर्धन समिती, उमरखेड यांच्या वतीने आज मा. उपविभागीय अधिकारी (SDO) साहेबांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदर निवेदनामध्ये समितीने नमूद केले आहे की, रस्ते रुंदीकरण, बांधकामे, औद्योगिक प्रकल्प व इतर विकासकामांदरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे वाढते तापमान, अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट तसेच जैवविविधतेचा ऱ्हास यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.
समितीने प्रशासनाकडे पुढील महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत – विकासकामांदरम्यान होणारी अनावश्यक वृक्षतोड तात्काळ थांबविणे, अपरिहार्य वृक्षतोडीपूर्वी “वृक्ष बचाव समिती” स्थापन करून त्यांच्या ग्रीन सिग्नल अहवालाशिवाय परवानगी न देणे, जुन्या व मोठ्या वृक्षांचे संरक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन मोहिमा राबविणे तसेच प्रत्येक बांधकाम परवानगीवेळी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करणे इत्यादी मागण्या करण्यात आल्या.
“विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे ही काळाची गरज असून पुढील पिढीसाठी सुरक्षित व हरित भविष्य निर्माण करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत,” असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष विजय रेघाटे, उपाध्यक्ष दिपक ठाकरे,सचिव विजय चौधरी व दिलीप भंडारे उपस्थित होते
चौकट
प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी यांची वृक्ष तोडी ला आळा बसविण्यासाठी एक समिती गठीत करण्यात यावी अशी मागणी अध्यक्ष विजय रेघाटे यांनी उपविभागीय अधिकारी यांचे कडे केली.












