ज्ञानेश्वर वायकुळे ग्रामीण प्रतीनीधी निंगनुर
सततची नापिकी व अंगावर असलेले कर्ज यामुळे मानसिक त्रासात असलेल्या एका पन्नास वर्षे शेतकऱ्याने त्याचे स्वतःचे शेतात फवारणी करिता आणलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. रामदास शामराव गव्हाळे वय 50 वर्ष राहणार निंगनूर तालुका उमरखेड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कुटुंबीयांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे, दिनांक 11 जुलै 2026 रोजी सायंकाळी अंदाजे सहा वाजताचे सुमारास रामदास गव्हाळे यांनी त्यांचे स्वतःचे शेतामध्ये फवारणीसाठी आणलेले विषारी औषध स्वतः प्राशन केले. ही माहिती रामदास यांचे कुटुंबीयांना मिळताच, तात्काळ कुटुंबीयांनी रामदास यांना फुलसावंगी येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणले. परंतु प्रकृती चिंताजनक होत चालल्यामुळे त्यांना सवना व त्या ठिकाणाहून पुसद उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचाराकरिता रेफर करण्यात आले.परंतु उपचार सुरु असताना, रात्री अंदाजे साडे 9 वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे रामदास गव्हाळे हे सततची नापिकी, शेती करीता घेतलेले कर्ज यामुळे ते नेहमी चिंतेत असायचे. आणि त्यातूनच त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज दिनांक 12 जुलै रोजी शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शहर पोलीस स्टेशन येथे गेलेल्या डेथ मेमोच्या आधारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतक रामदास यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, पत्नी, आई, तीन भाऊ असा आपला परिवार आहे. सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशन येथील पीएसआय संतोष खांडेकर सह पोलीस अंमलदार शेख मेहबूब यांनी केला आहे.












