विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
कृषी महाविद्यालय, उमरखेड अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाअंतर्गत कृषी कन्यांनी उमरखेड येथे शेतकऱ्यांसाठी “बियाण्यांच्या विविध वर्गांचे प्रात्यक्षिक” आयोजित केले. या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांचे महत्त्व, विविध बियाण्यांच्या वर्गांची माहिती आणि योग्य बियाण्यांची निवड याविषयी जागरूक करणे हा होता.
या प्रात्यक्षिकामध्ये न्यूक्लियस (Nucleus) सीड, ब्रीडर सीड (Breeder Seed), फाउंडेशन सीड (Foundation Seed), रजिस्टर्ड सीड (Registered Seed), सर्टिफाईड सीड (Certified Seed) आणि ट्रुथफुली लेबल्ड सीड (Truthfully labelled seed ) या सर्व बियाण्यांच्या वर्गांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्येक वर्गाचे उत्पादन कोणाकडून केले जाते, त्यावरील टॅगचा रंग, आनुवंशिक शुद्धता (Genetic Purity) आणि भौतिक शुद्धता (Physical Purity) यांचे प्रत्यक्ष नमुन्यांसह सादरीकरण करण्यात आले.
कृषी कन्यांनी विविध बियाण्यांच्या टॅगची ओळख करून देत ब्रीडर सीडसाठी सोनेरी पिवळा (Golden Yellow), फाउंडेशन सीडसाठी पांढरा (White), रजिस्टर्ड सीडसाठी जांभळा (Purple), सर्टिफाईड सीडसाठी निळा (Blue) आणि ट्रुथफुली लेबल्ड सीडसाठी हिरवा (Opal Green) टॅग वापरला जातो, तर न्युक्लियस सीड साठी कोणत्याही प्रकारेचे टॅग वापरले जात नाही अशी माहिती उपस्थित शेतकरी वर्गाला दिली. तसेच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना टॅग, उगवण क्षमता, वैधता कालावधी, वाणाचे नाव आणि प्रमाणपत्र यांची खात्री करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.
प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांचा वापर केल्यास पिकांची उगवण चांगली होते, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, उत्पादनात वाढ होते तसेच वाणाची आनुवंशिक शुद्धता कायम राहते, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कृषी कन्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
या उपक्रमास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. उपस्थित शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष नमुन्यांच्या माध्यमातून दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत भविष्यात प्रमाणित व दर्जेदार बियाण्यांचा वापर करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या महत्वपूर्ण उपक्रमात प्रामुख्याने कृषीकन्या पायल डहाके, भुमिका खडसे, संस्कृती सोनुने, श्रुती शिखारे व वैष्णवी कनाके यांचा सहभाग होता.
या विशेष कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय उमरखेड येथील प्राचार्य माननीय श्री सचिन चिंतले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक अनिल इंगळे , प्राध्यापिका पल्लवी घोटेकर . मार्गदर्शक प्राध्यापिका आरती राठोड व विषय तज्ञ प्राध्यापक योगेश वाकोडे यांनी विद्यार्थिनींना सखोल तांत्रिक ज्ञान देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमूल्य मार्गदर्शन केले.












