विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक..
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) उमरखेड येथील प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या उद्देशाने ३० दिवसांच्या ऑन जॉब ट्रेनिंगसाठी ५२ प्रशिक्षणार्थ्यांचा ताफा आज दि. १६ मार्च २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील धूत ट्रान्समिशन प्रा. लि. कंपनीकडे रवाना करण्यात आला.
या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना कंपनीतर्फे दरमहा सुमारे १२ ते १३ हजार रुपयांचा स्टायफंड देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार असून उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज, कंपनीची शिस्त, नियम, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती यांचा अनुभव मिळणार आहे.
धूत ट्रान्समिशन कंपनीमध्ये असलेल्या विविध प्लांटनुसार रोजगाराच्या भविष्यातील संधींची माहितीही प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार असून त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांसाठी कंपनीतर्फे कॉलेज कॅम्पसमधून बसची सोय करण्यात आली आहे. तसेच राहण्याची आणि जेवणाची सोय कंपनीतर्फे करण्यात येणार असून त्याचा खर्च स्टायफंडमधून समायोजित करण्यात येणार आहे.
आयटीआयच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणार्थ्यांना ३० दिवस उद्योगात प्रत्यक्ष प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. यासाठी धूत ट्रान्समिशन कंपनी आणि शासकीय आयटीआय उमरखेड यांच्यात करारनामा करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे येणाऱ्या काळात अनेक प्रशिक्षणार्थ्यांना उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
आज रवाना झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये शीट मेटल संद्याता व डिझेल मेकॅनिक इत्यादी ट्रेडचे विद्यार्थी असून त्यांच्यासोबत शिल्पनिदेशक श्री. सोनवणे सर व श्री. चिंचाळे सर उपस्थित आहेत. पुढील महिन्यात इलेक्ट्रिशियन, तारतंत्री, मोटार मेकॅनिक, फिटर आदी ट्रेडमधील प्रशिक्षणार्थ्यांनाही छत्रपती संभाजीनगर येथे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
या संपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे प्राचार्य मा. श्री. डी. पी. पवार यांनी विशेष प्रयत्न करून धूत ट्रान्समिशन कंपनीसोबत करार घडवून आणला असल्याने प्रशिक्षणार्थ्यांना उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.












