विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
उमरखेड नगरपरिषदेत महिला लोकप्रतिनिधीच्या पतीकडून प्रशासनात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप करत संपादक शेख इरफान यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. नगरपरिषदेच्या कामकाजात ‘हजबंड राज’ फोफावत असून त्यामुळे प्रशासनावर दबाव, कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण आणि विकासकामांत अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, जनशक्ती पॅनलच्या एका नगरसेविकेच्या पतीकडून कोणतेही अधिकृत पद नसताना नगरपरिषद कार्यालयातील फाईल्स हाताळणे, कर्मचाऱ्यांना दालनात बोलावून आदेश देणे आणि निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ च्या तरतुदींचे उल्लंघन असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून स्वतःच्या मर्जीप्रमाणे कामे करून घेणे, धमकावणे आणि मानसिक त्रास देण्याचे प्रकार होत असल्याने प्रशासनातील वातावरण बिघडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रिया व विविध विकासकामांमध्येही संबंधित व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदारांनी म्हटले आहे की, नगरसेविकेच्या अधिकारांचा वापर तिच्या पतीकडून होत असल्याने संबंधित नगरसेविकेचे पद केवळ नामधारी राहिले आहे. हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला हरताळ फासणारा असून पदाचा गैरवापर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत प्रशासनाकडे काही ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.
संबंधित व्यक्तीला नगरपरिषद कार्यालयात प्रवेश करण्यास तात्काळ बंदी घालावी.
मागील तीन महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून चौकशी करावी.
कर्मचाऱ्यांचे व कंत्राटदारांचे गुप्त जबाब नोंदवून दोषीवर गुन्हा दाखल करावा.
पदाचा दुरुपयोग होऊ दिल्याप्रकरणी संबंधित नगरसेविकेवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवावा.
दरम्यान, या तक्रारीवर सात दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास नागपूर खंडपीठातील उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच लोकायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यांच्याकडेही पुराव्यासह दाद मागण्यात येणार असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.
या प्रकरणामुळे उमरखेड नगरपरिषदेत खळबळ उडाली असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.













